नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | जिद्द, चिकाटी आणि सततच्या अभ्यासाच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणांनी ठरवले तर ते आभाळालाही गवसणी घालू शकतात, हेच भउर (ता. कळवण/सटाणा परिसर) येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने सिद्ध करून दाखवले आहे. भउर येथील तरुण विद्यार्थी वेडांत संजय पवार (पाटील) याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले असून, त्याची मुंबई मंत्रालयात प्रशासकीय विभागांतर्गत ‘महसूल सहाय्यक’ (Revenue Assistant) पदी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांकडून त्याचे कौतुक होत आहे.
वेदांत हा एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही कुटुंबापासून दूर राहून, वसतिगृहात राहून त्याने अभ्यासात सातत्य राखले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त गट-ब आणि गट-क (MPSC Subordinate Services Group B & C) परीक्षेत त्याने उत्तम गुण मिळवून हे घवघवीत यश संपादन केले.
वेदांतचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सटाणा येथील ‘लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा हायस्कूल’मध्ये झाले. त्यानंतर त्याने सटाणा येथीलच ‘कर्मवीर आबासाहेब सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून’ आपली बी.एससी. (B.Sc.) ची पदवी पूर्ण केली. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्याने कोपरगाव तालुक्यातील जंगली महाराज आश्रम (शिर्डी-कोपरगाव रोड) येथे प्रा. पंकज माळी सरांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र अभ्यास करून हे यश खेचून आणले.
यशाचे श्रेय माता-पित्याला:
“माझ्या या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षकांबरोबरच माझी आई सौ. अलकाबाई आणि वडील संजय पाटील (माऊली) यांच्या कष्टाला व आशीर्वादाला जाते,” अशी भावनिक प्रतिक्रिया वेदांतने यावेळी दिली.
वेदांतच्या या ऐतिहासिक यशाबद्दल भउर व विठेवाडी येथील शेतकरी बांधव आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या भउर येथील निवासस्थानी जाऊन त्याचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन व पारंपरिक फेटा बांधून गौरव केला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव, डॉ. जे. डी. पवार, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दीपक पंडित पवार, उषा फर्टिलायझर्सचे संचालक दीपक पवार, प्रगतीशील शेतकरी व कवी आभा आहेर, मिलिंद पवार यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी वेदांतला त्याच्या भावी प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.







