नाशिक (संपादक खुशाल देवरे) | कळवण तालुक्यात आज मान्सूनपूर्व पावसाने जोरदार वादळी वाऱ्यासह दमदार हजेरी लावत संपूर्ण परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या वादळाचा मोठा फटका तालुक्यातील अंबिका ओझर गावाला बसला असून, तब्बल १५ ते २० शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कळवण तालुक्यात तापमानाचा पारा कमालीचा वाढला होता. कडक उन्हामुळे आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, आज दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि काळ्या ढगांनी आकाश व्यापून टाकले. काही वेळातच विजांच्या कडकडाटासह आणि वेगवान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला.
या वादळाचा तीव्र तडाखा अंबिका ओझर गावाला बसला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, क्षणात १५ ते २० घरांवरील छपरांचे पत्रे हवेत उडून गेले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, हीच एक मोठी दिलासादायक बाब ठरली. मात्र, छपरे उडाल्यामुळे घरातील अन्नधान्य, कपडे आणि इतर संसारोपयोगी साहित्य पावसाच्या पाण्यात पूर्णपणे भिजून अतोनात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बाधीत कुटुंबांना मदतीचा हात दिला. नुकसानग्रस्त कुटुंबांनी प्रशासनाकडे त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासोबतच गारांचाही वर्षाव झाला. यामुळे रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहिले आणि बाजारपेठेत नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे या अवकाळी गारपिटीमुळे फळबागा आणि शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हा मान्सूनपूर्व पाऊस आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी पोषक मानला जात असला, तरी हवामानातील हा अचानक झालेला अत्यंत धोकादायक बदल लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कळवण तालुक्यात सध्याही अनेक भागांत ढगाळ वातावरण कायम असून, पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.







