हेक्टरी २५ हजार व १०० टक्के पीक विमा जाहीर करण्याची मागणी
यवतमाळ (विदर्भ संपादक ॲड. चंद्रकांत कराळे) – तालुक्यात सतत दोन आठवड्यापासून पाऊस सुरु असल्यामुळे मुगाचे पूर्ण नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे. त्यामुळे मुग उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के पीक विमा लागू करावा व हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, या मागणीसाठी आज युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब राणे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील व कृषी कार्यालयावर चक्क मुगाचे झाड व मुग घेऊन धडक दिली.
तालुक्यात १५ दिवसापासून सतत पाऊस सुरु असल्याने मुगावर कीटकनाशकाची फवारणी शेतकरी करु शकलेले नाहीत. त्यामुळे मुगावर पडलेल्या अळीने मुगाचे संपूर्ण नुकसान झाले असून, मुग पूर्णपणे सडला आहे. कापणी करण्यायोग्यसुध्दा मुगाची अवस्था नाही. तालुक्यात एकूण २८८ हेक्टरवर मुगाची पेरणी असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच कोरोनाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, लॉकडाऊन काळात साठवलेल्या पैशांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला, व्याजाने कर्ज काढून शेतीची पेरणी केली, त्यात पावसाने थैमान घालून, शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. उडीद, मुग पूर्णपणे गेला तर सोयाबीनला अजूनही शेंगा पकडल्या नाहीत. त्यामुळे मुग उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के पीक विमा लागू करावा. हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, या मागणीकरिता युवा सेनेने चक्क मुगाचे झाड व सडलेले मुग घेऊन तहसील व कृषी कार्यालयावर धडक दिली.
यावेळी युवा सेनेचे प्रकाश मारोटकर, बाळासाहेब राणे, सरपंच गोकुळ राठोड, विलास पाटील सावदे, मधुकर कोढाळे, श्रीकृष्ण सोळंके, गुणवंत चांदुरकर, गजानन लायबरे, अमय बनारसे, शुभम रावेरकर, पांडुरंग मारोटकर, लिलाधर चौधरी, मनोज बनारसे, आशिष हटवार, भुमेश्वर गोरे, संजय श्रावणी आदी शेतकरी उपस्थित होते.
सतत १५ दिवसांपासून तालुक्यात पाऊस सुरु असल्यामुळे शेतकरी मुग पिकावर फवारणी करु शकले नाहीत. त्यामुळे आज आम्ही मुगाचे झाड घेऊन तहसील व कृषी कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांना पीक विमा व हेक्टरी २५ हजार देण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदार यांनी पंचनामे करण्याचे निर्देश दिले असल्याचे, प्रकाश मारोटकर यांनी सांगितले.







