संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त न्याहळोद येथे कीर्तन सप्ताह; भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक

संत सावता महाराज

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन ): न्याहळोद येथील संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त न्याहळोद येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कीर्तन सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सप्ताहाच्या सांगतेनंतर संत सावता महाराजांच्या प्रतिमेची व पालखीची गावातून भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.

सप्ताहाच्या कालावधीत दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. संत सावता महाराज यांच्या विचारांचा प्रसार, भक्तीमार्गातून समाजप्रबोधन आणि एकोपा वाढविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पुण्यतिथीनिमित्त सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. टाळ-मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषासह संत सावता महाराजांचा जयघोष करीत पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत पालखीचे दर्शन घेतले. मिरवणुकीदरम्यान परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले.
मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत पुन्हा मंदिर परिसरात आली. यावेळी महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. संत सावता महाराजांनी श्रम, भक्ती आणि साधेपणातून समाजाला दिलेला संदेश आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या धार्मिक कार्यक्रमामुळे गावातील सामाजिक व धार्मिक एकोपा अधिक दृढ झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, भाविक, महिला मंडळ तसेच आयोजकांनी परिश्रम घेतले. पालखी मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here