जळगाव (प्रतिनिधी शेख जावीद) | शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामानंदनगर, मेहरूण, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल १ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीन, २ किलो ११४ ग्रॅम गांजा आणि दुचाकी असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एमआयडीसी पोलिसांच्या सहकार्याने पथकाने सापळा रचला.३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता दर्गा परिसरातील रस्त्यावर संशयित नूर मोहम्मद पटेल दुचाकीवरून येताना पोलिसांच्या हाती लागला. त्याची झडती घेतली असता १ किलो ९६३ ग्रॅम इफेड्रीन पावडर, २ किलो ११४ ग्रॅम गांजा आढळून आला. त्याच्याकडील सुझुकी बर्गमन दुचाकीसह हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जप्त केलेल्या इफेड्रीनची किंमत ९ लाख ८१ हजार ५०० रुपये, गांजाची किंमत १ लाख ५ हजार ७०० रुपये, तर दुचाकीची किंमत ३० हजार रुपये, अशी एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपये असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक फॉरेन्सिक तपासणीत जप्त पदार्थांमध्ये इफेड्रीन व गांजा असल्याचे निष्पन्न झाल्याचे वृत्त आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, इफेड्रीनचा स्रोत काय, तो कोणाला पुरवला जाणार होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गाणापुरे यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्याचे वृत्त आहे जळगाव शहरात अमली पदार्थांविरोधातील पोलिसांच्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, या कारवाईतून मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.







