बंगले आणि फार्महाऊस फोडणारी सराईत दरोडेखोरांची टोळी कल्याण गुन्हे शाखेकडून जेरबंद

कल्याण गुन्हे

मुंब्रा, बदलापूर, वाशिंद आणि टिटवाळा परिसरातील ८ गुन्ह्यांची उकल; मुख्य सूत्रधारावर तब्बल १८ गुन्हे दाखल

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) | मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच टिटवाळा, वाशिंद आणि कुळगाव-बदलापूर परिसरातील बंगले व फार्महाऊसवर दरोडे टाकून लुटमार करणाऱ्या सराईत टोळीचा कल्याण गुन्हे शाखेने (घटक-३) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मुंब्रा दरोड्यासह परिसरातील एकूण आठ घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी तुकाराम सत्यवान मुंढे यांच्या बंगल्याच्या खिडकीचे ग्रील तोडून ८ ते ९ दरोडेखोरांनी आत प्रवेश केला होता. बंगल्यात झोपलेले संतोष शेडगे यांना स्क्रूड्रायव्हरचा धाक दाखवत व जीवे ठार मारण्याची धमकी देत दरोडेखोरांनी त्यांचे हात-पाय आणि तोंड रुमालाने बांधले. त्यानंतर बंगल्यातील १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ८४ हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाकडून सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळासह सीएसएमटी ते बदलापूर आणि कसारा रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून विजय तुळशीराम चव्हाण (वय ४५, रा. बदलापूर), लक्ष्मण उमाजी भोसले (वय ४३, रा. वाशी, नवी मुंबई), सतिष सुरेश वाघे (वय २७, रा. भिवंडी), नारायण रघुनाथ ठोंबरे (वय २७, रा. बदलापूर) आणि जयेश सुरेश कथोरे (वय ३५, रा. अंबरनाथ) या पाच जणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या टोळीच्या अटकेमुळे कुळगाव पोलीस ठाण्यातील १, कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील २, वाशिंद पोलीस ठाण्यातील ३ आणि पडघा पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ७ इतर गुन्हेही उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी विजय चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर देहू रोड, लोणावळा, अलिबाग, कर्जत, मानगाव, वडगाव मावळ, सासवड, नेरळ, पनवेल आणि मुरबाड आदी पोलीस ठाण्यांत दरोडा, घरफोडी आणि शस्त्र अधिनियमांतर्गत तब्बल १८ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी नारायण ठोंबरे याच्यावरही कुळगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद आहे.

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण आणि उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here