
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी; सत्ताधाऱ्यांवर दडपशाही आणि घोळाचा आरोप
जळगाव (संपादक सुनिल पाटील) | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (२०२६-२०३१) पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीत मोठा गैरव्यवहार व राजकीय दबाव वापरला गेल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे आणि ही निवडणूक प्रक्रिया स्थगित (रद्द) करावी, अशा मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते माघारीच्या टप्प्यापर्यंत भाजप आणि महायुतीतील मित्रपक्षांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात राजकीय दडपण आणले. या दादागिरीमुळे अनेक पात्र उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्वक नामंजूर करण्यात आले. एका उमेदवाराला राजकीय धडा शिकवण्याच्या उद्देशाने जळगाव येथे त्याचा अर्ज बाद ठरवण्यात आला होता; मात्र संबंधित उमेदवाराने नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अपील केल्यानंतर तो अर्ज मंजूर झाला. विशेष म्हणजे, हा अर्ज कसा रद्द केला गेला आणि नंतर कसा मंजूर झाला, याची जाहीर कबुली खुद्द चाळीसगावच्या आमदारांनी युतीच्या मेळाव्यात प्रसारमाध्यमांसमोर दिली असल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे.
सत्तारूढ पक्षाचे मंत्री आणि आमदार निवडणूक प्रक्रियेत थेट हस्तक्षेप करत असून सत्ता, पैसा आणि बळाचा गैरवापर करून अनेक जागा बिनविरोध काढण्यात आल्या आहेत. तसेच, आता उर्वरित ९ जागांसाठी होणाऱ्या मतदानातही मतदारांना आर्थिक आमिष दाखवून आणि दबाव टाकून लोकशाही प्रक्रियेला गालबोट लावले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची पारदर्शक चौकशी होऊन ती स्थगित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन सादर करताना महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी अशोक लाडवंजारी, राजू मोरे, अमोल कोल्हे, किरण राजपूत, सुनील भैय्या माळी, गिरीश सांगळे, गणेश पाटील, राहुल भालेराव, रफीक पटेल, सुहास चौधरी, अबजेत खाटीक, इब्राहिम खान यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







