पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उपशाविरोधात नदीकाठी उपोषण सुरू

पूर्णा नदी

पोकलेन व पॉवर बोटींद्वारे उपसा होत असल्याचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले पाच सवाल

बुलडाणा (जिल्हा क्राइम रिपोर्टर सचिन जगदाळे) | तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध रेती उपशाविरोधात आजपासून नदीकाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. पोकलेन मशीन आणि पॉवर बोटींच्या माध्यमातून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात यापूर्वी तहसील प्रशासनाला निवेदन देऊनही कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

 

पूर्णा नदीपात्रात यांत्रिक पद्धतीने होणाऱ्या या उपशामुळे नदीची नैसर्गिक रचना, पर्यावरण आणि परिसरातील जलस्रोतांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी नांदुरा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात हा अवैध उपसा तात्काळ बंद करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, या प्रकरणात महसूल विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी, अशीही मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून यावर नेमकी काय कार्यवाही झाली, याची कोणतीही स्पष्ट माहिती न मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

निवेदनावर अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली न गेल्याने आंदोलनकर्त्यांनी तहसील प्रशासनासमोर खालील पाच प्रश्न उपस्थित केले आहेत: यापूर्वी दिलेल्या निवेदनाची अधिकृत चौकशी झाली आहे का?, नदीपात्रातील अवैध रेती उपशाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पथक पाठविण्यात आले होते का?, अवैध रेती उपसा करणाऱ्या माफियांवर आतापर्यंत कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली?, पोकलेन मशीन व पॉवर बोटींद्वारे सुरू असलेला उपसा रोखण्यासाठी कोणते आदेश काढण्यात आले?, महसूल विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेची चौकशी करून त्याचा अहवाल तयार केला आहे का?

अवैध रेती उपशाचा मुद्दा आता निवेदनापुरता मर्यादित न राहता थेट उपोषणापर्यंत पोहोचल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. नदीपात्राचे संरक्षण व्हावे आणि जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता तहसील प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणार की, नेहमीप्रमाणे हा प्रश्न केवळ कागदावरच राहणार, याकडे संपूर्ण नांदुरा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here