कल्याण (प्रतिनिधी आनंद गायकवाड) – कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनी मध्ये रहाणारे रिक्षा चालक श्री पवार यांची
रिक्षा काल रात्री काही समाजकंटकांनी पेटवून दिली . या मुळे पवार कुटुबियांचे उदर निर्वाहाचेच साधन नष्ट झाले . अचानक पणे कोसळलेल्या या संकटामुळे पवार कुटूंब हवालदिल झाले होते या घटनेची खबर लागताच गेल्या पाच महिन्यांपासून लॉक डाऊन मुळे अडचणीत सापडलेल्यांना काही प्रमाणात का होईना पण मदतीचा हात देणारे शिव सेना नगर सेवक महेश गायकवाड यांनी पवार कुटुंबियांकडे धाव घेत त्यांच्या कुटूबियांवर कोसळलेल्या संकटाचे गांभीर्य ओळखून रिक्षाच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी घेत पवार कुटूंबियांना दिलासा दिला .
गेल्या पांच महिन्यांपासून अधिक काळ लॉक डाउन मुळे सर्व रिक्षा चालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे . सध्या अनलॉक प्रक्रियेत रिक्षा चालकांना दोन प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे . परंतु जो पर्यंत रेल्वेची लोकल सेवा सुरु होणार नाही तो पर्यंत रिक्षा व्यवसायाला सध्या तरी काहीच कमाई नसल्याची परिस्थिती आहे . अशाच परिस्थितीत रिक्षा उभी करण्याच्या वादातून पवार यांची रिक्षा काही अज्ञात समाज कंटकांनी पेटवून दिली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .
श्री पवार यांच्या रिक्षाचे सुमारे ५० टक्क्याहून अधिक नुकसान झाले असल्याने त्यांचे कडून ही रिक्षा दुरुस्त होऊ शकत नसल्याने या रिक्षा दुरुस्तीचा सपूर्ण खर्च आपण उचलत असल्याचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितले .याबाबतची तक्रार श्री पवार यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दिली असून या रिक्षा जळीत प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलिस करीत आहेत .







