मुंबई (हितेश मिस्त्री) – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून ३१ ऑगस्टला रात्री दीडच्या सुमारास (क्र. एमएच ४६ बी एम ३७८०) गुजरात दिशेला जाणारा भरधाव कंटेनर शिरसाड नाका (ता. वसई) येथील उड्डाणपुलावरून खाली वज्रेश्वरीकडे जाणार्या वळण रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर कोसळला. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने शेजारील रहिवाश्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर कंटेनरच्या चेपलेल्या केबिनमधून ट्रक चालकाला काढण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उंचावरून कोसळून केबिनमध्ये चेंगरलेल्या चालकाचा मृत्यू झाला होता. हा ३५ वर्षीय चालक हा मूळचा सांगली जिल्ह्यातील राहणार असून सागर रामचंद्र मिसाळ असे मृत चालकाचे नाव आहे.
तर दुसर्या एका अपघातात भालिवली येथे अज्ञात वाहनाने एका व्यक्तीला ठोकरले. या अपघातानंतर भर रस्त्यात पडलेल्या त्या व्यक्तीच्या अंगावरून अनेक वाहने गेली. त्यामुळे अपघात झालेल्या त्या अज्ञात व्यक्तीच्या शरीराचा चेंदामेंदा झाल्याचे आढळले. हा अपघात सुद्धा महामार्गावरील गुजरात वाहिनीवर पहाटेच्या सुमारास घडला आहे. या दोन्ही अपघातांची नोंद मांडवी पोलिसांत करण्यात आली असून दुसर्या अपघातातील मृत अज्ञात व्यक्तीची माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस मृताच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.







