शिक्षक दिन विशेष : शिक्षकांनी तंत्रसमृद्ध होणे ही काळाची गरज

शिक्षण हा कुठल्याही राष्ट्राच्या विकासाचा पाया असतो. शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांना महात्मा गांधी ‘ज्ञानमंदिरे’ म्हणत असत. कुठल्याही देशात किंवा समाजात होणारे बदल हे शैक्षणिक परिवर्तनावर अवंलबून असतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत शिक्षण हा कणा आहे. रोजगारनिर्मिती आणि तरुणांना रोजगार संधी देणे हे केवळ शिक्षणाच्या माध्यमातूनच शक्य होते.
महात्मा गांधी शाळा व महाविद्यालयांना ‘टेम्पल ऑफ नॉलेज’ म्हणजेच ‘ज्ञानमंदिरे’ मानत. ज्ञानाचे ग्रहण करताना या मंदिरांचे पावित्र्य शिक्षणव्यवस्थेतील प्रत्येक घटकाने पाळले पाहिजे. प्रत्येक व्यक्‍तीने त्याचे पावित्र्य जपले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. शिक्षण प्रक्रियेतला आत्मा किंवा कणा म्हणजे शिक्षक. शिक्षणातल्या बर्‍या-वाईट दोन्ही गोष्टींना जबाबदार घटक म्हणजे शिक्षक. शिक्षणामधून निर्माण झालेल्या समस्यांचे उत्तरदायित्व ओघाने शिक्षकांकडे येते. मातृ देवो भव, पितृ देवो भव, आणि त्यानंतर आचार्य देवो भव ही उक्‍ती आजही प्रचारात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीत शिक्षकांचे स्थान मोलाचे आहे आणि म्हणून प्रत्येक शिक्षकाने आपल्या व्यवसायातही श्रीमंती शोधली पाहिजे, ओळखली पाहिजे, जाणली पाहिजे. आजच्या काळात शिक्षक हा त्या विद्यार्थ्याचा मार्गदर्शक झालेला आहे. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी समुपदेशक झालेला आहे. या काही महत्त्वाच्या भूमिका आजच्या शिक्षकांनी अत्यंत जबाबदारीने पार पाडणे आवश्यक आहे.
यंदाचा शिक्षक दिन हा कोरोना वैश्‍विक महामारीच्या पार्श्‍वभूमीवर साजरा होत आहे. कोरोनामुळे आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काही ना काही बदल झाले आहेत. परंतु, शिक्षणाच्या क्षेत्रात झालेले बदल फार मोठे आहेत. गेल्या वर्षापर्यंत जगाच्या दोन तृतीयांश भागात शाळा सुरू होण्याचा, बंद होण्याचा आणि सुट्ट्यांचा काळ जवळजवळ एकसारखाच होता. परंतु, 2020 मध्ये मात्र इतर वर्षांपेक्षा वेगळेच काहीतरी घडले आहे. आजमितीसदेखील जगातील सुमारे 150 हून अधिक देशांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः लॉकडाऊन पाळला जात आहे. ज्या-ज्या ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे त्या-त्या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाने केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनाही आपापल्या घरात कैद करून टाकले आहे किंवा मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट आणि डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये व्यस्त करून टाकले आहे. किंबहुना जगातील सर्वच शिक्षकांना कोरोनाने एका झटक्यात व्हर्च्युअल शिक्षक बनण्यास भाग पाडले, असेही म्हणता येईल.
अनेक शिक्षकांनी सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांमधून अशी कबुली दिली की, काही तासांसाठीच नव्हे तर काही मिनिटांसाठीही त्यांनी यापूर्वी कधीही कॅमेर्‍याचा सामना केला नव्हता. कॅमेर्‍याबद्दल त्यांना अजिबात माहितीसुद्धा नव्हती. परंतु, कोरोनामुळे एका झटक्यात देशातील नव्हे तर जगातील सर्वच शिक्षकांना ‘कॅमेरा फ्रेंडली’ व्हावे लागले. आजमितीस लक्षावधी, कोट्यवधी शिक्षक जगाच्या कोणत्या ना कोणत्या कोपर्‍यात कायम ऑनलाईन असतात. कारण, एकाच झटक्यात शाळा आणि महाविद्यालये व्हर्च्युअल दुनियेत प्रवेशकर्ती झाली. या बदलामुळे शिक्षकांच्या भूमिकेत काही बदल झाला आहे का, हा खरा प्रश्‍न आहे. शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांची भावना बदलली आहे का, असाही प्रश्‍न आहे. या प्रश्‍नांचे अचूक उत्तर देणे अवघड असले तरी एवढे मात्र गृहीत धरायला हवे की, आता शिकणार्‍या आणि शिकविणार्‍या व्यक्‍तींच्यामध्ये तंत्रज्ञान आले आहे आणि ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
गेल्या काही वर्षांत झालेल्या इंटरनेटच्या महाप्रसारामुळे माहितीचा सागर हा एका क्लिकसरशी उपलब्ध होत आहे. परिणामी, आजच्या काळात शिक्षक हा गुरू राहिला नसून, इंटरनेट गुरू झाला आहे. तंत्रज्ञानाने इंटरनेट, कॉम्प्युटर, गुगल यांसारखी खूप माध्यमे उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यामुळे आज खरोखरीच शिक्षकांची, प्राध्यापकांची आवश्यकता आहे का असाही प्रश्‍न विचारला जातो. पूर्वी एखाद्या विषयाचे ज्ञान पाहिजे असेल तर शिक्षकांकडे जावे लागत असे किंवा ग्रंथालयात जाऊन पुस्तके चाळावी लागत होती. आता या सर्व गोष्टींची गरजच राहिली नाही. इंटरनेटवर एका क्लिकमध्ये अनेक प्रकारची माहिती उपलब्ध होत आहे. इंटरनेट हे माहिती मिळवण्याचे सर्वांत मोठे आणि उपलब्ध सुलभ साधन बनले आहे. यामध्ये शिक्षकाची भूमिका ही फक्‍त विद्यार्थ्याला शिकवण्याची किंवा माहिती देण्याची राहिलेली नसून, विद्यार्थ्याला ज्ञानी बनवणे हे आज शिक्षकांचे काम आहे. यासाठी माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक केला पाहिजे.
पुढील पिढ्या शिक्षकांच्या तुलनेत कितीतरी अधिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असतील. हे लक्षात घेऊन शिक्षकांनी एकतर स्वतःमध्ये बदल करून घेतले आहेत किंवा त्यांना ते करावे लागणार आहेत. कारण, शिक्षकांची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर तांत्रिक झाली आहे. कोरोनाचा प्रकोप यथावकाश थांबेलच. परंतु, शिकण्या-शिकविण्याची पारंपरिक पद्धती पुन्हा परतणार नाही. भविष्यातील पिढ्यांना शिक्षित करण्यासाठी सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत बदल करावे लागणार आहेत, हे कटू सत्य आहे.
वस्तुतः पूर्वीच्या काळी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात केवळ वयाचाच नव्हे तर ज्ञान आणि भान यांच्या द‍ृष्टीनेही एक अंतर होते. त्यामुळे शिक्षक जे काही सांगत होते, जे काही शिकवत होते, त्यावर विद्यार्थी डोळे झाकून विश्‍वास ठेवत असत. कारण, त्यावेळी विद्यार्थ्यांकडे शिक्षकांपेक्षा प्रभावी असा ज्ञानाचा स्रोतच उपलब्ध नव्हता. परंतु, आता असे चित्र राहिलेले नाही. कारण, विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या हाताळणीबाबत शिक्षकांपेक्षाही दोन पावले पुढे आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात आणि पारंपरिक माध्यमांतसुद्धा वयस्क शिक्षक आणि शिक्षिकांकडून शेकडो तक्रारी आल्या होत्या. ऑनलाईन शिकविताना विद्यार्थी आपल्याला बराच त्रास देतात, अशा या तक्रारी होत्या. तंत्रज्ञानाने युक्‍त उपकरणे चालविण्यात विद्यार्थी शिक्षकांच्या कितीतरी पावले पुढे असतात आणि त्यामुळेच ऑनलाईन शिकविताना आपण दबावाखाली असतो, असे शिक्षकांचे म्हणणे होते. एवढेच नव्हे तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात अनुभवाचीही समस्या अचानक उभी ठाकली आहे. ज्या शिक्षकांकडे विद्यार्थ्यांना उत्कृष्टरीत्या शिकविण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे, अशा शिक्षकांनाच आज तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याच्या साहाय्याने चांगले सादरीकरण करण्याचा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळेही सध्याच्या काळात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विश्‍व बरेच बदलून गेले आहे.
सध्या होत असलेले बदल कधी घडलेच नसते असे नाही. कोरोनाचे सावट असते आणि नसते तरी हे बदल कधी ना कधी झालेच असते. कोरोनामुळे केवळ ते एकाच झटक्यात, ताबडतोब झाले. याच कारणामुळे शिक्षकांनी गडबडीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याची जबाबदारी तर उचलली. परंतु, आजकालच्या एक्स, वाय, झेड आणि अल्फा, बिटा जनरेशनला शिकविणे त्यांच्यासाठी फारसे सोपे राहिलेले नाही, हे त्यांच्या लक्षात आले. ऑनलाईन शिकवण्याच्या प्रक्रियेपासून अनेक खासगी शाळांतील शिक्षकांनी स्वतःला दूर ठेवले आहे, ते उगाच नव्हे. सरकारी शिक्षकांची अडचण अशी आहे की, ते अशा प्रकारची जोखीम पत्करू शकत नाहीत; अन्यथा त्रस्त तेही आहेतच.
वस्तुतः या त्रासाचे कारण विद्यार्थी नसून, बदलणारे तंत्रज्ञान हे आहे. इन्स्टंट मेसेंजर, स्नॅप चॅट आणि व्हॉटस् अ‍ॅपसारख्या माध्यमांतून संवादाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती विकसित होत आहेत, त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांपेक्षा अधिक ज्ञात आहेत आणि अध्यापकांसाठी त्या अत्यंत जटिल आहेत. केवळ आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात नव्या तंत्रज्ञानाशी आणि नव्या पद्धतींशी परिचित असलेल्या शिक्षकांची प्रचंड कमतरता जाणवू लागली आहे. एका अहवालानुसार, पुढील पाच वर्षांत अमेरिकेत 85 टक्के शिक्षक बदलण्यात येतील. कारण, आता टेक्नोस्मार्ट शिक्षकांची गरज मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. भले या शिक्षकांना आपल्याच विषयाची माहिती थोडी कमी असली तरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत मात्र त्यांना झेड जनरेशनच्या पुढे जावेच लागेल. तात्पर्य, असे की, यावर्षीचा शिक्षक दिन शिक्षकांसमोर नवे आव्हान घेऊन आला आहे. त्यांना लवकरात लवकर टेक्नोस्मार्ट बनावे लागणार आहे. यासाठी शिक्षक प्रशिक्षणावर अधिक भर देण्याची गरज आहे. कारण, शिक्षकाचे प्रशिक्षण हे शिक्षण क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने ज्ञानदानाचे अत्यंत मोलाचे कार्य करणार्‍या शिक्षकांना शुभेच्छा देतानाच त्यांच्याकडून भविष्यातील आव्हानांचा, बदलांचा वेध घेऊन उद्याच्या पिढीची घडवणूक व्हावी आणि त्यातून राष्ट्र अधिक बलशाली व्हावे, हीच अपेक्षा.

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here