शेतकरी ३ रुपये किलोने कांदा विकत होता तेव्हा प्रसारमाध्यमे काय झोपली होती का?

कांदा दरवाढीबाबत प्रसारमाध्यमांच्या भूमिकेबद्दल बोलताना कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांचा संतप्त सवाल

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा झाली असून, कांद्याचे सरासरी दर क्‍विंटलला दोन हजारांच्या पुढे गेले आहे. यावर्षी चाळींमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर साठवलेला असला तरी पावसामुळे कांदा मोठ्या प्रमाणावर सडला आहे. खरिपाच्या रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे खरीप कांद्याची लागवड कमी झाली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन कांद्याचे दर वाढले आहेत.
मात्र कांद्याचे भाव वाढल्यानंतर लगेचच वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाने कांदा महागला, याविषयी बातम्या करण्यास सुरुवात केली आहे. याबद्दल कांदा उत्पादक संघटना नाशिकचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली असून, याबाबत बुलंद पोलिस टाइम्स्‌शी बोलताना ते म्हणाले की, कांद्याचे भाव थोडे वाढले तर लगेच प्रसारमाध्यमांनी ओरड करण्यास सुरुवात केली. मात्र शेतकरी जेव्हा ३ रुपये किलोने कांदा विकत होता तेव्हा ही प्रसारमाध्यमे झोपली होती का? कांदा बियाणे कंपन्या ४००० रुपये किलोने कांद्याचे बियाणे विकून शेतकऱ्यांना नाडत असताना या प्रसारमाध्यमांनी त्याची बातमी लावली का?, कांद्याच्या वाढीसाठी लागणाऱ्या एका खताच्या गोणीसाठी १४०० रुपये लागतात आणि आताच झालेल्या पावसाने कांदा चाळींमधील ७५ टक्के कांदा सडला असल्याची एकतरी बातमी या माध्यमांनी लावली का?
शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या प्रसारमाध्यमांचा कांदा उत्पादक शेतकरी निषेध करत असून, आधीच कोरोना, अवकाळी, नैसर्गिक आपत्तीने नाडल्या गेलेल्या कांदा उत्पादकांना जर दोन पैसे मिळणार असतील, तर प्रसारमाध्यमांनी आपल्या टीआरपीसाठी त्याचा उपयोग करुन घेऊ नये. त्यांना बोलायचेच असेल तर कीटकनाशके, खते व तणनाशकांच्या वाढलेल्या किंतमतीवर बोलावे, बियाणांच्या किंमतींवर कृषी खात्याचे नियंत्रण नाही याबद्दल बोलावे, बियाणे कंपन्यांनी मांडलेला काळाबाजार रोखण्यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. याचवेळी शासनादेखील शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत किंमत निश्चित करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही केली आहे.
दरम्यान, मागील वर्षी चांगल्या पावसामुळे तसेच जानेवारी 2020 पर्यंत कांद्याचे दर क्‍विंटलला सरासरी अडीच- तीन हजारांपर्यंत होते. यामुळे राज्यात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. देशाच्या सरासरी कांदा लागवडीपेक्षा जवळपास 20 टक्के उत्पादन वाढल्यामुळे यंदा कांद्याचे दर पडतील, असा अंदाज होता. मे, जून व जुलै महिन्यात हा अंदाज खराही ठरला. मात्र, ऑगस्ट महिन्यात कर्नाटक राज्यात दरवर्षी येणार्‍या नवीन कांद्याची आवक झाली नाही. पावसामुळे तेथील कांद्याचे नुकसान झाल्याने आता पुढचे दोन महिने चाळींमध्ये साठवलेल्या उन्हाळ कांद्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. यामुळे उन्हाळ कांद्याच्या दरात वाढ झाली आहे.
शेतकरी चाळींमध्ये कांदा साठवून ठेवतो तेव्हा कांदा काही प्रमाणात खराब होणार हे गृहित धरले जाते. मात्र, यावर्षी कांद्याच्या सिंचनाला पुरेसे पाणी असल्यामुळे कांद्याचा आकार मोठा होऊन कांद्याचे उत्पादनही वाढले आहे. हा आकाराने वाढलेला कांदा चाळीत साठवल्यानंतर त्याचे खराब होण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक असल्याचा शेतकर्‍यांना अनुभव आहे. यामुळे चाळींमध्ये कांदा भरपूर असला तरी प्रत्यक्ष बाजार समितीत नेण्याजोगा कांदा कमी निघत असल्याने दर वाढूनही शेतकर्‍यांचे नुकसान टळणार नसल्याची भीतीही कुबेर जाधव यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here