[ad_1]
पुण्यातील बुधवार पेठ या भागाची रेड लाईट एरिया अशी ओळख आहे. या पेठेतील काही भागात वेश्याव्यवसाय चालत असतो, सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर या भागातील वेश्याव्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या आणि वेश्याव्यवसायावर उदरनिर्वाह असणाऱ्या महिलांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या महिलांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.
सध्याची परिस्थिती पाहता या महिलांकडे उत्पन्नाचं कुठलंही साधन नाही, त्यामुळे महिन्या ३ ते ४ हजार रुपये मानधन मिळावं, अशी मागणी या महिलांनी पत्राद्वारे नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे.

पुण्यातील बुधवार पेठ हा भारतातील सर्वात मोठ्या रेड लाईट एरियांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हजारो महिला इथं वेश्याव्यवसाय करण्याचं काम करतात. भारताच्या विविध भागातून आलेल्या तसेच नेपाळसारख्या देशातील महिला यामध्ये मोठ्या संख्येनं आहेत.
कोरोनाला प्रतिबंध व्हावा म्हणून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. पुण्यातील कोरोनाचा प्रभाव पाहता येथे या लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडकपणे करण्यात आली. पेठ एरियातील अनेक भाग सील करण्यात आले होते.

लॉकडाऊनमध्ये पुणे बंद झाल्याने अनेकांनी घरचा रस्ता धरला होता. परराज्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आपल्या घराकडे परतले. पोलिसांनी सर्व भाग जसे बंद केले तसाच बुधवार पेठेतील हा भाग देखील बंद केला.
लॉकडाऊननंतर अनेक सेक्स वर्कर महिला त्यांच्या गावी गेल्या आहेत. मात्र, प्रतिबंधित क्षेत्र आणि अपूर्ण कागदपत्रांअभावी अनेक महिला इथेच अडकून पडल्या आहेत. अद्याप अडीच हजार महिला इथे अडकून पडल्या आहेत.

ज्या महिला इथं अडकून पडल्या आहेत त्यापैकी अनेक महिलांचा चरितार्थ हा याच व्यवसायावर असल्याने त्यांच्या कमाईवर कुऱ्हाड कोसळली. अनेक महिलांनी आपल्याकडे साचवलेली आयुष्यभराची जमापुंजी बाहेर काढली आहे. काही दिवस यावर भागतील, मात्र भविष्याचं काय असा प्रश्न त्यांना सतावतो आहे.
ज्यांची जमापुंजी नाही त्यांच्यापुढे भीषण संकट उभं ठाकलं आहे, स्वयंसेवी संस्थांनी खाण्याची व्यवस्था केली असली तरी अशा महिलांना आपल्या भविष्याचा प्रश्न देखील सतावतो आहे.

सरकारने या कठीण काळात आम्हाला मदत करावी, अशी या महिलांची अपेक्षा आहे. देशभरातील विविध घटकांना पॅकेज जाहीर होत असताना आपल्यासाठीही काही तरतूद असावी, असं या महिलांना वाटत आहे.
दरम्यान, या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या व्यथा त्यांच्यापुढे मांडल्या आहेत. अडचणी काळात आम्हाला प्रत्येकी ३ ते ४ हजार रुपये महिन्याला मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे.

सरकारदरबारी आपल्या व्यथा मांडल्या असल्या तरी त्यांच्या मागण्यांना किती यश मिळतं याबद्दल प्रश्न आहे. कारण अद्याप सरकारकडून कसलीच मदत झाली नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
संवेदनशील छत्रपती; बळीराजाचं दुःख न पाहवल्याने राजेंनी स्वतः तिफन ओढली! पाहा व्ही़डिओ
सरकारचा खासगी लॅबला दणका; कोरोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात घेतला मोठा निर्णय
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात आज 163 रूग्णांना डिस्चार्ज… पाहा नव्या किती रूग्णांची नोंद
उद्या मुख्यमंत्री रायगडला जाऊन चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना मदतीचं वाटप करणार
राज्यात आज 3427 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?
[ad_2]
Source link






