- मोबाईल नसलेले विद्यार्थी घेतायेत ‘ऑफलाईन शिक्षण’
- या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची परिसरात सर्वत्र चर्चा
नाशिक (तन्मय गांगुर्डे) – मुलांचे थांबलेले शिक्षण सुरु करण्यासाठी शाळेतील शिक्षक मोबाईल नसलेल्या मुलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या पालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचात सामाजिक अंतर ठेवून, योग्य ती खबरदारी घेऊन कधी घराच्या ओसरीत,पडवीत,गोठ्यात ,झाडाखाली,अंगणवाडीच्या रिकाम्या खोलीत तर काही ठिकाणी अंगणात ओट्यावर पंधरा जुन पासुन आठवड्यातून दोन दिवस वर्ग भरवत ज्ञानदानाचे काम सुरू आहे.
या मुलांपर्यंत शिक्षण पोहचावे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक संजय गुंजाळ , शिक्षक खंडू मोरे हे या वस्तीवर जाऊन या विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमाच्या माध्यमातून फांगदर शाळेच्या मुलांच्या घरी शिक्षण या ऑफलाइन वर्गास पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांनी भेट दिली.
विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच शाळा बंद असताना देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी घेत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबरोबरच अवांतर वाचनाच्या देखील सूचना केल्या. शाळा बंद,शिक्षण चालु या उपक्रमातंर्गत गाव तेथे वाचनालय या उपक्रमातून वस्तीच्या परिसरातील एका पालकाच्या घरात वाचनालयचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वस्तीवर अवांतर वाचनासाठी पुस्तके उपलब्ध होणार आहेत. शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या थांबलेल्या शिक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत या गोष्टींचे यावेळेस मान्यवरांनी कौतुक केले आहे.







