मुंबई (हितेश मिस्त्री) – मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी तसेच मुंबई पोलिसांबद्दल भय व्यक्त करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात मंगळवारी हक्कभंग मांडण्यात आला. विधानपरिषदेत काँग्रेसच्या भाई जगताप यांनी कंगना विरोधात प्रस्ताव दाखल केला.
काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य भाई जगताप म्हणाले, हा केवळ हक्कभंग नसून ती मुंबई महाराष्ट्राशी कंगना रानौतने केलेली गद्दारी आहे. त्यामुळे हक्कभंग आणला आहे. याबाबतीत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या विरोधातही हक्कभंग मांडण्यात आला. विधानसभेत शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी गोस्वामी यांच्या विरोधात प्रस्ताव दाखल केला.
दरम्यान या प्रस्तावानंतर विधानसभेत विरोधी पक्ष भाजपच्या आमदारांनी प्रचंड गदारोळ घातला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले.सरनाईक यांनी अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर आणि वाईट बोलत असल्याचा आरोप केला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी, अशी मागणीही सरनाईक यांनी केली.
अर्णव गोस्वामी स्वत: न्यायाधीशाच्या भूमिकेत खटला चालवत निकाल देत आहेत, अशा शब्दात संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी गोस्वामींचा समाचार घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांनाही चौकट दिली आहे. या प्रत्येकाच्या चौकटी सुसंगत राहाव्यात असे घटना म्हणते. अर्णव स्वतःला न्यायाधीश समजतात का? हे कोण पत्रकार आहेत, ते सुपारी घेऊन काम करतात, असा अपमान करणार्या पत्रकाराला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी परब यांनी केली.







